शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. दिघी परिसरातील वडमुखवाडी येथे चोरट्याने एका घराला लक्ष्य करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे 50 हजार रुपये किमतीचे आणि 9 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. या प्रकरणी एका अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी येथील अलंकापुरम रोडवरील यशोभूमी बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये ही चोरी झाली. २१ ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सोन्याचे मंगळसूत्र घरातील कपाटात ठेवले होते. मात्र, महिला घरात नसताना घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहताच संधी साधू चोरट्याने दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ५० हजार रुपये किमतीचे आणि एकूण ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
मंगळसूत्र चोरीला गेल्याचे समजताच महिलेने तातडीने दिघी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार, अज्ञान चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.