शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंचा गंडा ; पुण्यातील व्यावसायिकाची मोठी फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंचा गंडा ; पुण्यातील व्यावसायिकाची मोठी फसवणूक

तळेगाव दाभाडे येथे शेअर ट्रेडिंगमध्ये 25 ते 30 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिषाने एका व्यक्तीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका महिलेविरोधात तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील रविंद्र नानासाहेब हुंडारे (वय 57 वर्षे) या व्यावसायिकाची  इन्स्टाग्रामवरील शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातीद्वारे संपर्क साधून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. जाहिरातीमध्ये शेअर ट्रेडिंगमधून  25 ते 30 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

हुंडारे यांना DELTA ALGO ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यांनी अॅपवर गुंतवणूक केल्यानंतर त्यांना मोठा नफा मिळाल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप आहे.  मात्र, गुंतवणुकीची रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न केला असता हुंडारे यांना आणखी टॅक्स भरण्यास सांगण्यात आले.

तक्रारीनुसार, हुंडारे यांना तब्बल 13,81,003 टॅक्स भरण्यास सांगण्यात आले. याशिवाय टॅक्स न भरल्यास मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR दाखल करण्याची, तसेच आयकर विभागाकडे तक्रार करून ट्रेडिंग खाते कायमचे बंद करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टॅक्सच्या नावाखाली पुन्हा पैसे मागितल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हुंडारे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर शेअर बाजारात जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या गुंतवणुकीच्या लिंकवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही ॲपमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची अधिकृतता तपासावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories