'लेक सिटी' प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तातडीने तयार करावा, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश
'लेक सिटी' प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तातडीने तयार करावा, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश
पुणे, ता. १७ - शहरातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी जांभूळवाडी, पाषाण आणि कात्रज तलावांसाठी 'लेक सिटी' प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तातडीने तयार करावा. तसेच जांभुळवाडी तलावाचे जलसंधारण विभागाकडून पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी नुकतेच प्रशासनाला दिले.
पाषाण, कात्रज आणि जांभूळवाडी या तलावांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेताना अनेक गंभीर बाबी समोर आल्या. तलावांमध्ये वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा विसर्ग, जलपर्णीचा प्रादुर्भाव, मृत मासे आढळले. त्यामुळे, शहरासाठी प्रस्तावित 'लेक सिटी' प्रकल्पाचा अधिकृत मास्टर प्लॅन तातडीने तयार करण्याच्या सूचना भिमाले यांनी दिल्या.
या प्रकल्पासाठी आवश्यक निधी, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलच्या अटी, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए) अहवाल आणि जैवविविधता संवर्धनासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद याबाबतचा सविस्तर अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जांभूळवाडी तलावाचे व्यवस्थापन जलसंधारण विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय आणि शासनस्तरीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कात्रज तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याच्या घटनांबाबत जल नमुने आणि प्रयोगशाळा अहवाल तातडीने सादर करावेत, पाषाण तलावातील जलपर्णी, सांडपाणी आणि कचऱ्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी. जलपर्णी हटविणे, गाळ काढणे आणि सांडपाणी रोखण्यासाठी खर्च झालेला निधी व मासे मृत्यू प्रकरणी पर्यावरण विभागाचा अंतिम अहवाल सादर करावा, असे आदेश भिमाले यांनी दिले आहेत.