देवीचा मुकुट व दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या दोघांना चाकणमधून अटक, तळेगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
देवीचा मुकुट व दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या दोघांना चाकणमधून अटक, तळेगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पिंपरी, ता. १७ - मावळातील इंदुरी गावचे ग्रामदैवत कडजाई माता मंदीरातील दानपेटीतील रक्कम आणि तळेगाव दाभाडे मधील तुळजाभवानी माता मंदीरातील देवीचा मुकुट चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना तळेगाव एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ४८ तासांच्या आत ताब्यात घेतले. आरोपींकडून १ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच घरफोडीचे तीन गुन्हेही उघड झाले आहेत. कुणाल बाळू वीर (वय २३ वर्षे) आणि लोबो उर्फ सुर्या दास (वय २६ वर्षे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
दिनांक १२ जून २०२६ रोजी मध्यरात्री इंदुरी गावचे ग्रामदैवत कडजाई माता मंदीरातून दान पेटीतील रोख रक्कम आरोपी हे घेवुन गेले होते. त्या अनुषंगाने तळेगाव एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 339(3), 339(8), 304, 3(4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर, गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गुन्हयाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज मिळवले. त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत संशयीत आरोपी हे चाकण परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या दोन पथकांनी तिथे आरोपींचा शोध घेतला.
आरोपी १) कुणाल बाळू वीर (वय २३ वर्षे, रा. सुंबरेनगर, चाकण, ता. खेड) आणि २) लोबो उर्फ सुर्या दास (वय २६ वर्षे, मजुरी, रा. कडाचीवाडी चाकण, ता. खेड) यांना पोलिसांनी अटक केली. सखोल तपास केला असता त्यांनी तळेगाव दाभाडे, म्हाळुंगे येथे अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निषन्न झाले आहे. त्याच्याकडून १ किलो २५० कि.ग्रॅ. वजनाचा देवीचा चांदीचा मुकुट व रोख रक्कम जप्त केली. तळेगाव एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे, तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे, दक्षिण म्हाळुंगे पोलिस ठाण्यात दाखल असलेले घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उपआयुक्त परीमंडळ - ४ श्वेता खेडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एम.आय.डी.सी पोलिस ठाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक, दिपक खरात, पोलिस हवालदार ४६८/अनंत रावण, ९०१/वसीम शेख, पोलिस नाईक/१०६७ ज्ञानेश्वर सातकर, पोलिस शिपाई २३८३/गणेश दरंदले, ३०९१/रोहीत माने, ३५८४/रमेश घुले, ३४६५/भिमराव खिलारे व ३५७१/विनायक शेरमाळे यांनी केली आहे.