मोशी येथे किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २ - विजेच्या खांबास मोबाईल चार्जिंग लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी, लाकडी बांबूने व दगडाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता. १) बो-हाडेवाडी, मोशी परिसरातील गोल्डन जिमच्या मागील मोकळ्या जागेत घडली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी साधु साहेबराव फुलमाळी (वय ३५, व्यवसायिक, रा. वामदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रावसाहेब माणिक काकडे (वय २८), लक्ष्मण रामा फुलमाळी (वय २२), संजय आप्पा गायकवाड (वय १९) आणि विकास शिवराम गजरे (वय २३) यांनी संगनमत करून त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या प्रकरणी आरोपींवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 118(2), 352 तसेच 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.