पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील १० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महापौर रवी लांडगे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष आणि कामगार नेते यशवंत भोसले यांनी यासंदर्भात महापौरांकडे मागणी केली होती.
शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता महापौर कार्यालयात कामगार नेते यशवंत भाऊ भोसले आणि महापौर रवी लांडगे यांच्यात कंत्राटी कामगारांच्या बोनस आणि वेतनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी कंत्राटी कामगार शहर स्वच्छ ठेवण्यापासून आरोग्य, सुरक्षा आणि अत्यावश्यक सेवांपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अनेकदा अधिक कष्टाचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच काही कंत्राटदारांकडून वेतनामध्ये बोनसची रक्कम दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात प्रत्येक कामगाराला बोनस मिळतोय का, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या मागणीची महापौरांनी दखल घेतली असून सानुग्रह अनुदानासाठी आवश्यक आर्थिक गणित तपासण्याचे निर्देश मुख्य लेखापरीक्षकांना दिले आहेत. तसेच लेख विभागाकडून अहवाल सादर झाल्यानंतर अनुदानाच्या रकमेबाबत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य, सुरक्षा आणि इतर विभागांमध्ये जवळपास १० हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यापासून ते विविध अत्यावश्यक सेवा पुरवण्यापर्यंत हे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मेहनतीची जाणीव असून त्यांची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी महापालिका सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
काही कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करून बोनसच्या स्वरूपात वर्षाला सुमारे १८ ते १९ हजार रुपयांचा लाभ मिळाल्याचेही महापौरांनी सांगितले.
आता महापालिका प्रशासनाकडून आर्थिक गणित स्पष्ट झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेमके किती सानुग्रह अनुदान मिळणार, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.