घंटागाडी कर्मचाऱ्यांना ३० हजार, आशा स्वयंसेविकांना १५ हजारांपर्यंत भत्ता

घंटागाडी कर्मचाऱ्यांना ३० हजार, आशा स्वयंसेविकांना १५ हजारांपर्यंत भत्ता

पिंपरी-चिंचवड | ५ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांसह आशा स्वयंसेविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपये दिवाळी बक्षीस, तर पात्र आशा स्वयंसेविकांना ७ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही विषयांना मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत शहरातील कचरा संकलनाची सेवा देणाऱ्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी दिवाळीनिमित्त विशेष सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. संबंधित खर्चास आता मंजुरी मिळाली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, शहरात १९९७ पासून घंटागाडी कंत्राटदारांमार्फत कचरा संकलनाची सेवा दिली जात आहे. सध्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल या दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना २००६ पासून दिवाळीनिमित्त विशेष बक्षीस देण्याची परंपरा आहे.

मागील आर्थिक वर्षातही कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपये बक्षीस देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यंदाही महापालिका कर्मचारी महासंघ आणि विविध घंटागाडी कंत्राटदारांनी बक्षीस देण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्तांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर स्थायी समितीने प्रत्यक्ष खर्चास मंजुरी दिली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) झोपडपट्टी आणि झोपडपट्टीसदृश भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांसाठीही प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे.

या भत्त्यासाठी सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ हा कालावधी विचारात घेतला जाणार आहे. या कालावधीत किमान १८० दिवस म्हणजेच सहा महिने काम केलेल्या आशा स्वयंसेविका प्रोत्साहन भत्त्यासाठी पात्र ठरणार आहेत. भत्त्याची किमान रक्कम ७ हजार रुपये आणि कमाल रक्कम १५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या प्रोत्साहन भत्त्याचा खर्च वैद्यकीय विभागाच्या कुटुंब कल्याण अंतर्गत असलेल्या ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ या लेखाशीर्षातून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयाबाबत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घंटागाडी कर्मचारी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. त्यांच्या मेहनतीची दखल घेऊन त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार देणे आवश्यक आहे.

तसेच शहरातील आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयंसेविकांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सेवेला प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने प्रोत्साहन भत्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories