पिंपरी-चिंचवड | ५ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पॅनेलवर नियुक्त असतानाही महापालिकेच्या विरोधात खटले लढवणाऱ्या वकिलांबाबत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेकडून नियमित मानधन स्वीकारूनही महापालिकेच्या विरोधात खटले लढवणाऱ्या वकिलांना यापूर्वी दिलेले मानधन परत मिळवण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक बारणे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या पॅनेलवरील वकिलांची नियुक्ती, त्यांची कामगिरी आणि त्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत प्रशासनाकडून सविस्तर माहिती मागवण्यात आल्याचे सांगितले.
महापालिकेच्या पॅनेलवरील वकिलांनी आतापर्यंत महापालिकेच्या वतीने किती खटले लढवले, त्यापैकी किती खटल्यांमध्ये महापालिकेच्या बाजूने निकाल लागला आणि संबंधित वकिलांची एकूण कामगिरी कशी राहिली, याचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे.
या अहवालाच्या आधारे संबंधित वकिलांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः महापालिकेकडून मानधन घेत असताना महापालिकेच्या विरोधात खटले लढवण्यात आले आहेत का, याची माहिती तपासली जाणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.
संबंधित वकिलांच्या कामगिरीचा आणि त्यांनी हाताळलेल्या खटल्यांचा संपूर्ण तपशील उपलब्ध होईपर्यंत त्यांच्या मानधनाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून सविस्तर माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
यासंदर्भात अभिषेक बारणे म्हणाले, "महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या वकिलांनी आपल्या बाजूने किती खटले लढवले आणि त्यांची कामगिरी काय आहे, याचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. जे वकील महापालिकेकडून मानधन घेत असतानाही आमच्याच विरोधात खटले लढवत आहेत, त्यांना दिलेली रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया केली जाईल. जोपर्यंत यासंदर्भातील सर्व सविस्तर माहिती समोर येत नाही, तोपर्यंत हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असून, यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही."
महापालिकेच्या कायदेशीर कामकाजासाठी नियुक्त केलेल्या वकिलांच्या कामगिरीची तपासणी करण्यावर स्थायी समितीने भर दिला आहे. संबंधित वकिलांना देण्यात आलेल्या मानधनाचा आणि त्यांनी हाताळलेल्या प्रकरणांचा तपशील समोर आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.