स्वतः वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करुन दुसऱ्याला मारहाण, देहूरोडमधील घटना
पिंपरी, ता. ४ - स्वतः वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत, बेदरकारपणे वाहन चालवत दुसऱ्याला अरेरावी करुन मारहाण केल्याचा प्रकार १ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारास सेंट्रल चौकाच्या पुढे डिव्हायडर जवळ घडला. दोन आरोपींवर रविवारी (ता. ३) देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, मारहाण झालेले रोहीदास शांताराम जाधव (वय ४८ वर्षे, रा. शेलारवाडी ता. मावळ) यांनी तक्रार दिली आहे. रोहीदास जाधव हे त्यांच्या इलेक्ट्रिक टू व्हिलर गाडीवर देहुरोडहून शेलारवाडीच्या दिशेने जात होते.
त्यावेळी, सेंट्रल चौकाच्या पुढे डिव्हायडर जवळ, सेक्शन हॉस्पिटल समोर, एक सेंट्रो कार (क्रमांक: MH १२ CY ३४५५) अचानक डिव्हायडर क्रॉस करून मुंबई-पुणे हायवेवर आली आणि फिर्यादीच्या गाडीला टक्कर दिली. या घटनेनंतर, गाडीच्या नियंत्रणात घेतल्यावर जाधव यांनी सेंट्रो कार चालकाला जाब विचारला. त्यावर कारमधील दोन व्यक्तींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्याला मारहाण केली. एकाने नाकावर ठोसा मारल्याने नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. याशिवाय, इतर ठिकाणी मुका मार लागला.
या प्रकरणी आरोपी नरेंद्र अशोक मुरुडकर आणि त्याचा साथीदार यांच्यावर रविवारी (ता. ३) देहुरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११७ (२), ३५२,३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.