थेरगावमध्ये ८ लाख ३७ हजारांचे तंबाखुजन्य पदार्थ जप्त, वाकड पोलिसांची कारवाई
पिंपरी, ता. १० - थेरगाव परिसरातून वाकड पोलिसांनी एकुण किंमत ८ लाख ३७ हजार १०९ रुपयांचे तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले. ही कारवाई सोमवारी (ता. ८) आनंदवन सोसायटी, थेरगाव येथे करण्यात आली. या कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे.
याबाबत, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार 8 जून 2026 रोजी थेरगाव येथील आनंदवन सोसायटी, लेन क्रमांक 6 मधील तळमजल्यावरील खोलीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ८ लाखांहून अधिक रकमेच्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. तो साठा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी खोली मालक किशोर लाहू लोंढे उर्फ कुमार लोढे (वय 32) याला अटक केली असून तो प्रतिबंधित अन्नपदार्थ व्यवसायाशी संबंधित असल्याचा संशय आहे. अन्य आरोपी अमोल लाहू लोढे (वय 36), राजेंद्र किसन टेकाळे, रुस्तम खान आणि बाबर खान यांचाही तपास सुरू आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसूचनेनुसार राज्यात सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट सुपारी व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे. तरीही आरोपींकडून प्रतिबंधित पदार्थांचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.