बावधन | 17 सप्टेंबर 2026 : 40 गुंठे जमीन विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगून जमीन व्यवहाराच्या नावाखाली विश्वास संपादन करत ऑनलाइन 80 लाख रुपये स्वीकारल्यानंतर जमीन विक्री न करता आणि ठरलेला व्यवहार पूर्ण न करता 60 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अरविंद अनिल माळी (वय 44, थेरगाव रोड, डांगे चौक, चिंचवड, पुणे-33) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सुधीर रमेश बराटे (वय 42, रा. बावधन, पुणे) आणि सचिन जोरी (वय अंदाजे 40, रा. मु. पो. माले, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 17 सप्टेंबर 2026 पर्यंत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींनी फिर्यादीला 40 गुंठे जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी कागदपत्रे दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीकडून ऑनलाइन स्वरूपात 80 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र, त्यानंतर जमीन विक्री करण्यात आली नाही. इतर व्यवहारांचे आमिष दाखवून ते व्यवहारही पूर्ण करण्यात आले नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
शेवटी तिसरा व्यवहार पूर्ण करण्याबाबत वकिलांची नोटीस दिल्यानंतर फिर्यादींना व्यवहार पूर्ण करण्यासाठी आश्वस्त करण्यात आले. त्यानंतर पैसे परत करण्याचा तगादा लावल्यानंतर आरोपींनी 19 लाख 99 हजार रुपये परत केले. उर्वरित 60 लाख 1 हजार रुपये परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 465/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(4), 3(5) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.