मोशीतील तळवडे मेडिकल शॉपच्या परवान्यात फेरफार

मोशीतील तळवडे मेडिकल शॉपच्या परवान्यात फेरफार

मोशी | 17 सप्टेंबर 2026 : मोशी येथील तळवडे मेडिकल शॉपच्या परवान्याशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोन डॉक्टरांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागीदारीत असलेल्या मेडिकल शॉपचा परवाना रद्द करण्यासाठी अर्ज व संमतीपत्रावर खोट्या व बनावट सह्या केल्याचा तसेच परवान्यात बदल करून भारती एक्सा लाईफ शाखेकडून कर्ज घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संजय मोहन सिंग राठोड (वय 55, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रा. सी/ओ मनीषा वाणी, शिवकालीन सोसायटी, सी/41, सहावा मजला, रास्ते वस्ती, मोशी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी  डॉ. प्रशांत मधुकर पाटील (कांबळे) (वय 34, नायर कॉलनी, साने चौक, चिखली, पुणे) आणि डॉ. रविकांत अशोक हडपद (चिंचवडे) (वय 35, चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत सहायक आयुक्त (पुणे विभाग), अन्न व औषध प्रशासन, सेक्टर क्रमांक 4, एफडीए भवन, प्लॉट क्रमांक 1/2, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, ऑर्किड हॉस्पिटलशेजारी, मोशी येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तळवडे मेडिकल शॉपच्या परवान्याबाबत आरोपी क्रमांक एक आणि दोन हे भागीदारीत असल्याचे नमूद आहे. मेडिकल शॉपचा परवाना रद्द करण्यासाठी अर्जावर आणि संमतीपत्रावर खोट्या व बनावट सह्या करून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या कार्यालयाकडून परवाना रद्द करून घेतल्याचा आरोप आहे.

त्यानंतर परवाना स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे तसेच आरोपी क्रमांक दोन याने मेडिकल शॉपच्या परवाना फॉर्म क्रमांक 20 मध्ये बदल करून आरोपी क्रमांक एकाचे नाव कमी केले आणि स्वतःचे एकट्याचे नाव नमूद करून भारतीय एक्सा लाईफ शाखा, चिंचवड येथून कर्ज घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 652/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 336(2)(3), 340(2), 3(5) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खोसे करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories