चऱ्होली | 17 सप्टेंबर 2026 : चऱ्होली परिसरात घरात झोपलेल्या 75 वर्षीय महिलेच्या डोक्यात स्टीलच्या पाणी पिण्याच्या तांब्याने मारून त्यांना जमिनीवर आपटत खून केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान आवास योजना म्हाडा, कोतवालवाडी, चऱ्होली येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ नागनाथ थोरात (वय 50, रा. पंतप्रधान आवास योजना म्हाडा, बिल्डिंग नं. 4, बी विंग, फ्लॅट नं. 1007, दहावा मजला, कोतवालवाडी, चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील साईनाथ थोरात (वय 25, रा. पंतप्रधान आवास योजना म्हाडा, बिल्डिंग नं. 4, बी विंग, फ्लॅट नं. 1007, दहावा मजला, कोतवालवाडी, चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या सासू माया लक्ष्मण अहिवळे (सासरकडील नाव माया आनंदराव भोसले, वय 75) या घरात झोपलेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांच्या डोक्यात स्टीलच्या पाणी पिण्याच्या तांब्याने मारून त्यांना जमिनीवर आपटले. या मारहाणीत त्यांचा खून झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 तसेच भारतीय दंड संहिता कलम 302, 201 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बेरे करत आहेत.