नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेते ओंकार राऊत व अभिज्ञा भावे यांना कलागौरव पुरस्कार जाहीर
नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेते ओंकार राऊत व अभिज्ञा भावे यांना कलागौरव पुरस्कार जाहीर
पिंपरी, ता. ५ - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे, मावळ शाखेचा २१ वा वर्धापनदिन सामारंभ गुरुवारी (ता. ७) आयोजित केला आहे. हा समारंभ सायंकाळी ६:३० वाजता तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ग्रंथालयाशेजारी, नाना भालेकर कॉलनीमध्ये होणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते ओंकार राऊत आणि नाट्य व चित्रपट अभिनेत्री अभिज्ञा भावे यांना 'कलागौरव पुरस्कार' व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे मावळशाखाध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या समारंभाला ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते व आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, बालरंगभूमी मध्यवर्ती परिषद - मुंबईच्या अध्यक्ष अॅड. नीलम शिर्के-सावंत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य अभिनेते राजन भिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार वितरण समारंभानंतर लावणी सम्राज्ञी संगीता लाखे आणि सहकाऱ्यांचा 'परंपरा महाराष्ट्राची' हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आपल्या आवडत्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी आवर्जून या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला शाखेचे उपाध्यक्ष दीपक बाळसराफ, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, खजिनदार नितीन शहा उपस्थित होते.