पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने ‘मिशन संधी’ची दमदार सुरुवात
दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उद्योग क्षेत्र एकत्र
पिंपरी, ता. ४ - "पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेले दिव्यांग भवन हे केवळ आपल्या शहरापुरते मर्यादित न राहता, देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल म्हणून उभे राहत आहे. यामध्ये शहरातील उद्योगसमूह, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्राने ‘मिशन संधी’सारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक समावेशक आणि सक्षम समाज घडविण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अधिकाधिक संस्थांनी रोजगाराच्या संधी निर्माण करून, कौशल्य विकासाला चालना देऊन आणि सीएसआरच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना ठोस सहकार्य देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे.",असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने “मिशन संधी” या उपक्रमाचा प्रारंभ वाकड येथील हॉटेल सयाजी येथे उत्साहात पार पडला. दिव्यांग बांधवांना स्वयंपूर्ण, सक्षम आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाश्वत एम्प्लॉयर इकोसिस्टम उभारण्याच्या उद्देशाने वर्षभर चालणाऱ्या व्यापक मोहिमेची ही प्रभावी सुरुवात ठरली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर लांडगे बोलत होते.
या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी तसेच विविध कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर लांडगे म्हणाले, "पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेले दिव्यांग भवन हे केवळ आपल्या शहरापुरते मर्यादित न राहता, देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल म्हणून उभे राहत आहे. २०२४ पासून सुरु झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश मिळाले असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारा बदल घडत आहे. या यशामागे कॉर्पोरेट क्षेत्राचे आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून मिळालेल्या सहकार्याचे मोठे योगदान आहे. दिव्यांग भवनमध्ये २१ प्रकारच्या दिव्यांगत्वासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित थेरपी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे केंद्र केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता, दिव्यांग बांधवांसाठी आत्मविश्वास, सन्मान आणि नव्या संधी निर्माण करणारे एक सक्षम व्यासपीठ ठरत आहे. तसेच महापौर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या केंद्राला भेट दिली तेव्हा मला खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान मिळाले. आगामी काळात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. मात्र, या सर्व उपक्रमांमध्ये व्यावसायिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे."
शहरातील उद्योगसमूह, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्राने ‘मिशन संधी’सारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक समावेशक आणि सक्षम समाज घडविण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अधिकाधिक संस्थांनी रोजगाराच्या संधी निर्माण करुन, कौशल्य विकासाला चालना देऊन आणि सीएसआरच्या माध्यमातून ठोस सहकार्य देऊन या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील महापौरांनी केले.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, " ‘मिशन संधी’ समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी संवेदनशीलतेने उभारलेल्या चळवळीचा प्रारंभ आहे. दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. तसेच व्यावसायिक, उद्योगसमूह आणि कॉर्पोरेट क्षेत्राने या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास ते दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदूत’ ठरु शकतात."
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, "मिशन संधी हा उपक्रम केवळ एक योजना नसून, तो समाजपरिवर्तनाची दिशा देणारा उपक्रम आहे. दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. सीएसआर निधी असो किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे प्रत्येक स्तरावरून सहाय्य आणि सहकार्य वाढले पाहिजे. याशिवाय, स्थायी समिती सभापती या नात्याने या उपक्रमाला संस्थात्मक पातळीवर अधिकाधिक पाठबळ देण्याचा माझा प्रयत्न राहील. "
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, " 'मिशन संधी'ची आज झालेली सुरुवात ही केवळ एक प्रशासकीय उपक्रमाची सुरुवात नसून, ती सामाजिक बांधिलकीची नवी दिशा देणारा उपक्रम आहे. आज येथे उपस्थित असलेल्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी दिव्यांग बांधवांविषयी अधिक संवेदनशील आणि जागरूक आहेत, हे पाहून सकारात्मक आशा निर्माण होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही जगातील एकमेव महानगरपालिका आहे जी दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचा व्यापक आणि परिणामकारक उपक्रम राबवत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या उपक्रमामुळे इतर महानगरपालिकांसाठी पिंपरी चिंचवड एक मार्गदर्शक ठरत आहे. याशिवाय, महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांची अचूक माहिती मिळवण्यासाठी ‘होम टू होम सर्वे’ सुरु करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाद्वारे दिव्यांगांची ओळख पटवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, तसेच दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत."
दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख म्हणाले," मिशन संधी आरंभ’ हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी शाश्वत आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याचा एक ठोस आणि दीर्घकालीन प्रयत्न आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात स्थान देणे ही काळाची गरज आहे. दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही कौशल्य विकास, थेरपी, मार्गदर्शन आणि रोजगारसंधी यांचा एकत्रित विचार करुन एक सक्षम व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, ही चळवळ यशस्वी होण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र, उद्योगसमूह आणि व्यावसायिक यांचा सक्रिय आणि सातत्यपूर्ण सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आज अनेक कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून योगदान देत आहेत, पण आता त्यापुढे जाऊन ‘inclusive hiring’ म्हणजेच दिव्यांगांना थेट रोजगार देण्यावर भर देणे आवश्यक आहे. म्हणूनच, शहरातील तसेच देशभरातील अधिकाधिक व्यावसायिक, उद्योग आणि संस्थांनी ‘मिशन संधी’मध्ये सहभागी होऊन केवळ आर्थिक मदत न करता प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती, कौशल्य प्रशिक्षण आणि समावेशक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा."
दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया म्हणाले, "दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, तर वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आणि स्वतःची ताकद ओळखण्याची संधी आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला, पण त्या अडचणींना कारण न बनवता, त्याच माझी प्रेरणा बनवली आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. आज दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड क्षमता आहे, फक्त त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि विश्वासाची गरज आहे. ‘मिशन संधी’सारखे उपक्रम हे त्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. "
या उपक्रमांतर्गत कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, एचआर आणि सीएसआर प्रमुख, विविध स्वयंसेवी संस्था (एनजीओ), सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी यांनी एकत्र येत दिव्यांग समावेशन व रोजगार या विषयावर सखोल चर्चा आणि संवाद साधला. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता सहभागी संस्थांकडून दिव्यांगांच्या उपजीविकेसाठी ठोस आणि औपचारिक नबांधिलकी (प्रतिज्ञा) स्वीकारण्यात आली. यावेळी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिव्यांग बांधवांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
मिशन संधी या उपक्रमात विविध कंपन्यांच्या सहकार्याने वर्षभर दिव्यांग बांधवांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास, प्रशिक्षण यांसारख्या विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. तसेच, ‘मिशन संधी’च्या माध्यमातून अधिकाधिक व्यावसायिक आणि उद्योगसमूहांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी इन्क्लुझ्झा, बेंगळुरु या संस्थेने नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहिले. तसेच दिव्यांग समावेशन आणि ऑपर्च्युनिटी मॉडेल संदर्भात मार्गदर्शन केले. याशिवाय, रोहिणी पीपल टेक्नॉलॉजी प्रा. लि. या संस्थेने इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून सहकार्य केले. जामध्ये कॉर्पोरेट संपर्क, सहभाग समन्वय व प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत कामकाजाचा समावेश होता.