20 रुपयांच्या नाण्यावर 55 लाखांचे आमिष; आळंदीत शेतकऱ्याची 19 लाखांची फसवणूक

20 रुपयांच्या नाण्यावर 55 लाखांचे आमिष; आळंदीत शेतकऱ्याची 19 लाखांची फसवणूक

आळंदी | २८ ऑक्टोबर २०२६ : इन्स्टाग्रामवरील रील्सच्या माध्यमातून २० रुपयांच्या नाण्याच्या बदल्यात ५५ लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याची १९ लाख ४ हजार १०० रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र बाबाजी उंदरे (वय ३२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

ही घटना ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजल्यापासून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.५२ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या प्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी मोबाईलवर इन्स्टाग्राम रील्स पाहत असताना त्यांना एक रील दिसली. त्यामध्ये २० रुपयांचे नाणे असल्यास त्या बदल्यात ५५ लाख रुपये मिळतील आणि प्रोसेसिंग फी केवळ ७५० रुपये असेल, असे सांगण्यात आले होते.

या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी रीलमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर त्यांनी पैसे जमा केले.

फिर्यादीनुसार, शिवकृपा पतसंस्था, आळंदी येथील त्यांच्या खात्यातून ८ लाख ६२ हजार १०० रुपये, तर पत्नीच्या नावावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून आणि फोनपेच्या माध्यमातून १० लाख ४२ हजार रुपये पाठविण्यात आले.

अशाप्रकारे फिर्यादीकडून एकूण १९ लाख ४ हजार १०० रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, आश्वासन दिलेली रक्कम त्यांना मिळाली नाही.

उलट आरोपींकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास फोन करून अटक करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात विकास पटेल, राणा प्रताप सिंह, झोरा सिंह यांच्यासह संबंधित मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०४/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ६१(२), ११२(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरके करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories