शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

दिघी | २८ ऑक्टोबर २०२६ : शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ६० वर्षीय निवृत्त व्यक्तीची २० लाख ६० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार दिघी परिसरात समोर आला आहे. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मार्गदर्शन करून विविध बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र, गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पैसे काढता आले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल सुरेश कुमार (वय ६० वर्षे, व्यवसाय निवृत्त, रा. ए विंग, फ्लॅट क्रमांक ११०४, वेलिंग्टन प्राइड वर्ल्ड सिटी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

ही फसवणूक १० जुलै २०२६ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांना 'A121 Star Project' आणि 'Elite investor 11' या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या ग्रुपवर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे UPSTOX नावाचे ॲप वापरून विविध बँक खात्यांवर एकूण २० लाख ६० हजार रुपये जमा केले.

गुंतवणुकीनंतर ॲपवर त्यांना नफा आणि मुद्दलाची रक्कम दिसत होती. मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर ॲपवरील विड्रॉलचा पर्याय काढून टाकण्यात आल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली असता, त्यांना Everest IMS Technogle या कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच हा आयपीओ विकल्याशिवाय पैसे काढता येणार नसल्याचे सांगून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

फिर्यादी यांनी संबंधित व्यक्तींना फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७२/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अन्वये अज्ञात महिला, संबंधित बँक खातेदार आणि व्हॉट्सॲपवर गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारे करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories