टेनिस नेट बांधताना शिडीवरून पडून कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा

टेनिस नेट बांधताना शिडीवरून पडून कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा

पिंपरी | २८ ऑक्टोबर २०२६ : चिंचवड एमआयडीसी परिसरातील सोलारिस स्पोर्ट्स अँड लेझर क्लबमध्ये टेनिस नेट बांधण्याचे काम करताना शिडीवरून पडून  कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून न दिल्याने आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास सोलारिस स्पोर्ट्स अँड लेझर क्लब प्रायव्हेट लिमिटेड, काळभोरनगर, एमआयडीसी, चिंचवड, पुणे येथे घडली.

या प्रकरणी सिकंदर युनूस शेख (वय ५१ वर्षे, व्यवसाय खासगी नोकरी, रा. सर्व्हे क्रमांक १०१/२, महाडकर सोसायटी, प्लॉट क्रमांक ५०४, उजवी भुसाई कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गुलाम मोहम्मद सोनू शेख (वय ३८ वर्षे, व्यवसाय फॅब्रिकेशन व साफसफाई कामगार, रा. पवार वस्ती, चिखली, पुणे; मूळगाव कोठा चौहान, पुरवा वजीरगंज, जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीच्या माध्यमातून समीर सैफी आणि सुभान सैफी यांना क्लबमध्ये उंचावरील पत्र्याची साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याच्या कामासाठी लावण्यात आले होते.

मात्र, कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. तसेच कंत्राटदाराने सुरक्षा साधनांचा वापर होत असल्याची खात्री केली नाही आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षिततेची खबरदारी घेतली नसल्याचा आरोप आहे.

काम सुरू असताना समीर सैफी शिडीवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच शिडी पकडून उभे असलेल्या सुभान सैफी यांच्या हातालाही दुखापत झाली.

गंभीर जखमी झालेल्या समीर सैफी यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याच दिवशी सायंकाळी ११.५८ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८६/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) आणि १२५(अ) अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories