उत्तर चाकण | २८ ऑक्टोबर २०२६ : खेड तालुक्यातील दौंडकरवाडी गावठाणात जुने घर पाडण्याच्या आणि वाटणीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात फिर्याद दिली असून, उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मौजे दौंडकरवाडी गावठाण, ता. खेड, जि. पुणे येथे घडली.
पहिल्या प्रकरणात बाळासाहेब निवृत्ती दौंडकर (वय ५४ वर्षे, व्यवसाय शेती, रा. दौंडकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून साजन नामदेव दौंडकर (वय २५), रोहित नामदेव दौंडकर (वय २३), सागर पाटील दौंडकर (वय ३५) आणि बबन सोपान दौंडकर (वय ६०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, जुने घर पाडण्याच्या आणि वाटणीच्या वादातून फिर्यादी व त्यांची पत्नी नंदा यांना धमकावण्यात आले. यावेळी आरोपी क्रमांक चारने लोखंडी रॉडने मारहाण करून फिर्यादीच्या उजव्या खांद्याला दुखापत केली. तसेच आरोपी क्रमांक एकने लहान मुलगा लखन याला काठीने, तर आरोपी क्रमांक तीनने हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०१४/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात साजन नामदेव दौंडकर (वय २५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. दौंडकरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बाळासाहेब निवृत्ती दौंडकर, रामहरी दौंडकर, लखन दौंडकर आणि नंदा दौंडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीनुसार, जुन्या घराच्या वाटणीच्या वादातून आरोपींनी मिळून लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या पाठीत व भावाला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीची आई मंगल दौंडकर यांना धमकावून हातापायी करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या बबन दौंडकर यांच्या डोक्यात दगड मारल्याने रक्तस्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक १०१५/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास उत्तर चाकण पोलीस ठाण्याकडून सुरू असून, पहिल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बंडे, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आटोळे करीत आहेत.