वाकड | २८ ऑक्टोबर २०२६ : व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ४७ वर्षीय व्यक्तीची १३ लाख ८९ हजार ९९९ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार वाकड परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश अभिमन्यू पवार (वय ४७ वर्षे, वाकड, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
ही फसवणूक १६ ऑगस्ट २०२६ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी यांना एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले होते. या ग्रुपवर त्यांना गुंतवणुकीसंदर्भातील योजना सांगण्यात आली. तसेच गुंतवणूक करण्यासाठी एका नवीन व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देण्यात आली.
फिर्यादी यांनी संबंधित ग्रुपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अँड्रॉइड ॲपची लिंक पाठवण्यात आली. त्यानुसार त्यांनी मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून स्वतःची प्रोफाइल तयार केली.
त्यानंतर आरोपीने सांगितलेल्या पद्धतीने फिर्यादी यांनी वेगवेगळ्या खात्यांवर पैसे जमा केले. २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत त्यांनी एकूण १३ लाख ८९ हजार ९९९ रुपये गुंतवले.
मात्र, गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यासाठी आणखी पैसे भरण्याची मागणी करण्यात आल्याने फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी संबंधित बाबत चॅटजीपीटीवर तपासले असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर फिर्यादी यांनी राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८६/२०२६ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे करीत आहेत.