भोंदू खरात पोलिस कोठडीतही करतोय मंत्रजप, तपास यंत्रणांची माहिती
खरातच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे ED कडे पाठवण्याची तयारी सुरु
पुणे, ता. २७- भोंदू अशोक खरात पोलिस कोठडीत आहे. तिथे चौकशीमध्ये त्याने आश्चर्यचकीत करणारे विचित्र विधान केले आहे. "मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, हे सर्व माझ्या अंतर्मनाच्या आवाजाने घडले.", असे खरात म्हटले आहे. तपास यंत्रणांनी ही माहिती दिली आहे.
तपास यंत्रणानी सांगितले की, पोलिस कोठडीत खरात सतत मंत्रजप करत असतो आणि वारंवार पुटपुटत असतो. मी जे केले ते सर्व विधीचाच एक भाग होता, असं खरात सांगतोय. '' माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले, तेच माझ्यावर उलटले. आता पुढे मी कोणाचेही ऐकणार नाही, फक्त माझ्या मेंदूचे ऐकणार.'', असं तो म्हणाला.
विशेष तपास पथकाने खरातच्या कार्यालयाची झडती घेतली असता महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तंत्र-मंत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, तांब्याची बाटली, गंडेदोरे, काही महिलांचे केस, पूजा विधीचे साहित्य, प्लास्टिकचा वीस फुटी साप, महागड्या कस्तुरीच्या नावाने विक्रीसाठी बनवलेला कच्चा माल, अत्तराच्या बाटल्या, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
नाशिक आणि नगर जिल्ह्यात त्याच्या नावे ५२ मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट खडे, रत्न आणि मध विक्रीतून मिळालेला पैसा या बाबींमुळे केंद्रीय तपास यंत्रणादेखील आता खरातची चौकशी करणार आहेत. त्याच्या २१ देशांतील विदेश दौऱ्यांचा खर्च, विदेशी चलन व्यवहार आणि तुर्कस्थानसह अन्य देशांतून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का, याची सखोल चौकशी होणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे ED कडे पाठवण्याची तयारी सुरु आहे.