भोसरी | 19 सप्टेंबर 2026 : अनधिकृतपणे भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले असून, पुढील कारवाईसाठी तिला भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. परकीय नागरिक नोंदणी शाखेमार्फत तिला बांगलादेशात हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद गार्डन शेजारील परिसरात एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची माहिती ATB ला मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरात शोध घेतला असता डायमंड लॉज येथे लवली रोविंदर जाट ही मध्य प्रदेशातील संशयित महिला आढळून आली. तिच्याकडील आधारकार्डची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले.
चौकशीत तिने आपले बांगलादेशातील नाव लवली मो. अबु बकर सिद्दीक शेख, वय 29 वर्षे, रा. ग्राम बाडुरगाछा, पोस्ट कुलटी, ठाणा खुडुडिया डुमुरिया, जि. खुलना, बांगलादेश असल्याचे सांगितले. तसेच सुमारे दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याची कबुली देत सध्या रोबिंद्र जाट नावाच्या इसमासोबत इंदूर, मध्य प्रदेश येथे राहत असल्याचे तिने सांगितले आहे.
तिच्या मोबाईलमधील फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून बांगलादेशातील तिचा मुलगा, आई आणि इतर नातेवाईकांशी संपर्क करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिला पुढील कारवाईसाठी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल न करता त्यांना तात्काळ हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार 2 मे 2025 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील ATB ने एकूण 30 बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला असून, त्यापैकी 26 जणांना बांगलादेशात हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित चार जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू आहे.