निगडी | १९ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला सेंट उर्सुला हायस्कूल, निगडी येथे उत्साहात प्रारंभ झाला. १९ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली विविध वयोगटांत सहभागी होत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, प्रशासन अधिकारी (क्रीडा) दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
उद्घाटनाच्या दिवशी १९ वर्षांखालील मुलांच्या गटात अनेक सामने रंगले. सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेजने कमलनयन बजाज हायस्कूलवर १४-०८, तर इंदिरा स्कूलने जय हिंद हायस्कूलवर २०-०० असा विजय मिळवला. अक्षरा इंटरनॅशनल स्कूलने साधू वासवानी स्कूलला १८-०६ ने पराभूत केले.
पुढील सामन्यांमध्ये सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेजने इंदिरा नॅशनल स्कूलवर १३-०५, नोव्हेल ज्युनिअर कॉलेजने क्रीम सन अँड शॉप ग्लोबल स्कूलवर ०८-०४, तर सेंट उर्सुला हायस्कूलने नोव्हेल ज्युनिअर कॉलेजवर २६-०० असा विजय मिळवला. एल प्रो स्कूल, चिंचवडने सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेजवर २७-१० असा विजय नोंदवला.
स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होत असल्याचे सांगितले.