छाटलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत मिळणार

छाटलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत मिळणार

पिंपरी-चिंचवड : शहरातील विकासकामे, रस्ते रुंदीकरण आणि इतर कारणांसाठी छाटण्यात येणाऱ्या झाडांच्या लाकडाचा आता योग्य वापर केला जाणार आहे. हे लाकूड वाया न घालवता शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. याबाबत संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात विविध विकासकामे करताना अनेक ठिकाणी झाडांची छाटणी करावी लागते. या छाटणीतून मोठ्या प्रमाणात लाकूड उपलब्ध होते. मात्र, योग्य व्यवस्थापनाअभावी हे लाकूड अनेकदा इकडे-तिकडे पडून राहते किंवा वाया जाते. ही बाब लक्षात घेऊन छाटणीतून मिळणारे लाकूड सामाजिक उपयोगासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार झाडांच्या छाटणीतून उपलब्ध होणारे लाकूड शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये पाठवले जाणार आहे. तेथे अंत्यविधीसाठी हे लाकूड नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांना स्वतंत्रपणे लाकूड खरेदी करून आणण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर महापालिकेकडे उपलब्ध होणाऱ्या लाकडाचेही योग्य व्यवस्थापन होणार आहे.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, शहरात विविध कारणांमुळे छाटल्या जाणाऱ्या झाडांमधून निकोप आणि चांगल्या दर्जाचे लाकूड मिळते. ते फेकून देण्याऐवजी स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची अडचण कमी होण्यास मदत होईल. संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories