पिंपरी-चिंचवड | 17 सप्टेंबर 2026 : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या 19 वर्षीय बांगलादेशी महिलेला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेने एक वषार्षापूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कार्यवाहीसाठी तिला देहूरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून तिची बांगलादेशात हद्दपारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर 2026 रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वर्ग लॉज येथे बांगलादेशी महिला अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला.
शोधादरम्यान एक महिला मिळून आली. सुरुवातीला तिने आपण पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगितले. मात्र, दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने अधिक चौकशी केली असता ती बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, संबंधित महिला फिहा मो.मजिदुर रहमान (वय 19, रा. ग्राम-बोधरा, पोस्ट-हाशरा, थाना-जामनगर, जिल्हा-सतखिरा, देश-बांगलादेश) येथील असल्याचे समोर आले. तिने एक वषार्षापूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तिच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता IMO ॲप आणि WhatsApp च्या माध्यमातून ती बांगलादेशातील आई-वडील व इतर नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिला पुढील कार्यवाहीसाठी देहूरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
परकीय नागरिक नोंदणी शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या माध्यमातून संबंधित महिलेला भारतातून बांगलादेशात हद्दपार (Deportation) करण्याची कार्यवाही विशेष शाखेमार्फत सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 20 मे 2026 ते 18 सप्टेंबर 2026 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्य करणारे एकूण 29 बांगलादेशी नागरिक शोधून ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी 26 जणांना बांगलादेशात हद्दपार करण्यात आले असून उर्वरित 3 नागरिकांच्या हद्दपारीची कार्यवाही सुरू आहे.