सायबर फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार नोंदविण्याचे पोलिसांचे आवाहन!

सायबर फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार नोंदविण्याचे पोलिसांचे आवाहन!

पुणे | 17 सप्टेंबर 2026 : सायबर फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने गप्प न बसता तातडीने तक्रार नोंदवणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी तक्रार केल्यास सायबर गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करणे शक्य होते, असे मार्गदर्शन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबरतज्ज्ञ तथा सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमांतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) गणेशोत्सवात ‘सायबर सुरक्षा जागरूकता’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी पीएमआरडीएतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून बचावाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष, कस्टम किंवा फेडएक्स पार्सलच्या नावाने धमकीचे फोन, वीज बिल, गिफ्ट व्हाउचर, रिवॉर्ड पॉइंट्स तसेच व्हॉट्सॲपवर वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस असल्याचे भासवून पैसे मागण्याच्या माध्यमातून फसवणूक केली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केले.

मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवरील फसवणूक, बनावट कर्ज देणारे ॲप तसेच एनीडेस्क किंवा क्विक सपोर्टसारखे ॲप डाउनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ताबा मिळविण्याच्या प्रकारांपासूनही सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला. अनोळखी व्यक्तींना बँक खाते, एटीएम किंवा इतर आर्थिक साधने कमिशनच्या आमिषाने वापरण्यास देऊ नयेत. असे केल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडिया खात्यांसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवावे, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि अज्ञात APK फाइल इन्स्टॉल करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या. गहाळ मोबाईल ब्लॉक करण्यासाठी आणि स्पॅम कॉलची तक्रार करण्यासाठी ‘संचार साथी’ पोर्टलचा वापर करण्याची माहिती देण्यात आली.

सायबर फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला पीएमआरडीएचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, सायबरतज्ज्ञ पोलीस कॉन्स्टेबल समीर घाडगे व शिवाजी बनसोडे उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories