महाराष्ट्र | 18 सप्टेंबर 2026 : तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वेगवान जीवनशैलीमुळे तणाव वाढत असताना योग व्यक्तीला संतुलन, जागरूकता आणि एकाग्रता प्रदान करतो. मन, शरीर आणि आत्म्यामध्ये संतुलन साधण्यास योग मदत करतो आणि अधिक जागरूक व निरोगी जीवन जगण्यासाठी तो प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, माजी केंद्रीय मंत्री तथा कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, राकेश सेक्सरिया यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योगामुळे व्यक्तीला थांबण्याची, विचार करण्याची, श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळते, असे राधाकृष्णन यांनी सांगितले. भारतातील तरुणांच्या ऊर्जा, कौशल्य आणि आकांक्षांना शिस्त व जागरूकतेची जोड मिळाल्यास त्यांची क्षमता अधिक प्रभावीपणे विकसित होऊ शकते आणि यामध्ये योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
स्वामी कुवलयानंद यांनी 1924 मध्ये योगाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी कैवल्यधामची स्थापना केली. गोर्धनदास सेक्सरिया कॉलेजने योग शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत हा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संस्थांची असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी योगाची जागतिक लोकप्रियता वाढत असताना त्याचे मूलभूत ज्ञान, वैज्ञानिकता आणि मूळ तत्त्वज्ञान जपणे आवश्यक असल्याचे सांगितले. गोर्धनदास सेक्सरिया कॉलेजचा अमृत महोत्सव हा केवळ संस्थेच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा नव्हे, तर भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन आणि प्रसारणाचाही उत्सव असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कैवल्यधामने योगाच्या क्षेत्रात संपादित केलेले ज्ञान आणि अनुभव जगाच्या कल्याणासाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी स्वामी कुवलयानंदजींच्या पत्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.