पेन्शन कार्ड APK फाइलद्वारे ५.१० लाखांची सायबर फसवणूक

पेन्शन कार्ड APK फाइलद्वारे ५.१० लाखांची सायबर फसवणूक

बावधन | २२ ऑक्टोबर २०२६ : पेन्शन कार्ड घरपोच देण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाला फोन करून त्यांची ५ लाख १० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार बावधन परिसरात समोर आला आहे. अज्ञात मोबाईलधारकाने व्हॉट्सॲपवर 'Bank_of_Maharashtra_Pension_Card.apk' ही फाइल डाउनलोड करण्यास सांगून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मोहन रामरतन भावसार (वय ८२ वर्षे,  डीएसके रानवारा सोसायटी, बावधन, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

२१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.५४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या बावधन येथील घरी असताना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून त्यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पेन्शन कार्डची डिलिव्हरी करण्याचा बहाणा केला.

त्यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादीच्या व्हॉट्सॲपवर एका मोबाईल क्रमांकावरून 'Bank_of_Maharashtra_Pension_Card.apk' या नावाची फाइल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकारातून त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून ५,१०,००० रुपये परस्पर काढण्यात आले. हा आर्थिक व्यवहार त्यांच्या संमतीशिवाय झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेन्शन कार्ड, बँक सेवा किंवा इतर आर्थिक सुविधांच्या नावाने येणाऱ्या अनोळखी लिंक आणि APK फाइल डाउनलोड करण्यापूर्वी नागरिकांनी खात्री करणे आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अशा फोन कॉल्सबाबत सतर्क राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories