पिंपरी-चिंचवड | लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज अनिल बनसोडे यांची जनता दल (युनायटेड) अर्थात JDU पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वाजिद रज्जाक सय्यद यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीनंतर शहरातील पक्षसंघटन मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना जोडणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्याची जबाबदारी बनसोडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
धर्मराज बनसोडे हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, लोकहितवादी सेवा संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. नागरिकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि जनहिताच्या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. सामाजिक कार्यातून निर्माण झालेला जनसंपर्क आणि राजकीय क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
२०२४ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून धर्मराज बनसोडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक राजकीय परिस्थिती, नागरिकांच्या अपेक्षा आणि मतदारसंघातील विविध समस्यांचा अनुभव मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आता जनता दल (युनायटेड) पक्षाच्या माध्यमातून पिंपरी, चिंचवड आणि भोसरीसह संपूर्ण शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, पक्षाची विचारधारा नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना धर्मराज बनसोडे म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांच्या विविध प्रश्नांचा जवळून अनुभव मिळाला. लोकहितवादी सेवा संघाच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक कार्य आणि नागरिकांशी असलेल्या संपर्काचा उपयोग जनता दल (युनायटेड) पक्षाचे शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी करणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, स्थानिक विकास आणि जनहिताच्या विषयांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
धर्मराज बनसोडे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये जनता दल (युनायटेड) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.