ताथवडेत विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर

ताथवडेत विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर

पिंपरी-चिंचवड | २३ ऑक्टोबर २०२६ : स्वच्छ शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश दिला.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छतेविषयी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून पथनाट्य सादर करण्यात आले.

या पथनाट्यात विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करणे, रस्त्यावर कचरा न टाकणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या विषयांवर जनजागृती केली. स्वच्छ शहर घडविण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांसोबत नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सादरीकरणातून अधोरेखित करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेच्या सवयी रुजविणे आणि त्यांच्या माध्यमातून हा संदेश घराघरांत पोहोचविणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या नियमांचे पालन केल्यास घरासह परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होऊ शकते, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

महापालिकेने नागरिकांना घरातील कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करण्याचे आवाहन केले आहे. वर्गीकरण केलेला कचरा महापालिकेच्या घंटागाडीकडे सुपूर्द करावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असेही सांगण्यात आले.

या उपक्रमाला ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने आणि आरोग्य निरीक्षक कोमल फर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंब आणि समाजावरही होतो. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सवयी नागरिकांनी अंगीकाराव्यात. तसेच महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. नागरिकांच्या सामूहिक सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी पिंपरी-चिंचवड शहर घडविणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories