आकुर्डीत जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एकाला अटक

आकुर्डीत जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एकाला अटक

निगडी | २२ ऑक्टोबर २०२६ : आकुर्डी परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून २१ वर्षीय तरुणावर नऊ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यावर सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने प्रहार करण्यात आला. तसेच त्याच्या मित्रावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील एबीसी जंक्शन सोसायटीसमोर, आयफॉक्स ऑप्टिशियनजवळ घडली.

या प्रकरणी केदार संतोष यादव (वय २१ वर्षे, व्यवसाय शिक्षण, राहणार नवीन पोस्ट ऑफिससमोर, चिखली गावठाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये करण साठे आणि त्याचे आठ ते नऊ साथीदार यांचा समावेश आहे. आरोपींची पूर्ण नावे आणि पत्ते अद्याप उपलब्ध नसून, करण साठे याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, केदार यादव आणि त्यांचा मित्र हर्षद पवार यांचा करण साठे याच्यासोबत पूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादातून करण साठे आणि त्याच्या साथीदारांनी दोघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मारहाण सुरू असताना केदार यादव आणि हर्षद पवार यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले. त्यानंतर करण साठे याच्या एका साथीदाराने हातातील कड्याने केदार यादव यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारहाण करून दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच करण साठे याच्या दुसऱ्या साथीदाराने रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलून केदार यादव यांना मारहाण केली.

दरम्यान, करण साठे याने त्याच्याकडील धारदार आणि टोकदार शस्त्राने हर्षद पवार यांच्या डोक्यावर व पाठीच्या डाव्या बाजूस वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१), ११८(१), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९० आणि ११५(२), ३५२, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ सह १३५ आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्टच्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories