क्लोव्हिस फायनान्शियल सर्व्हिसेस प्रकरण; गुंतवणूकदारांना पोलिसांचे आवाहन

क्लोव्हिस फायनान्शियल सर्व्हिसेस प्रकरण; गुंतवणूकदारांना पोलिसांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : गुंतवणुकीवर आकर्षक आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे स्वीकारल्याप्रकरणी ‘क्लोव्हिस फायनान्शियल सर्व्हिसेस’ (Clovise Financial Services) या फर्मशी संबंधित गुन्ह्याचा सांगवी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी नागरिकांनी गुंतवणूक केलेली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, फसवणूक झाल्याची तक्रार असलेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता अंबरीश जोशी (रा. ई-१४, अक्षयनगर फेज-१, विशाल नगर, पिंपळे निलख, पुणे) यांच्या मालकीच्या क्लोव्हिस फायनान्शियल सर्व्हिसेस या प्रोप्रायटरी फर्ममार्फत नागरिकांकडून गुंतवणूक स्वीकारण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. गुंतवणुकीवर चांगला आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे स्वीकारल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

याप्रकरणी ४ जून २०२६ रोजी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तपासादरम्यान संबंधित फर्ममध्ये इतर नागरिकांनीही आर्थिक परताव्याच्या अपेक्षेने पैसे गुंतवले असण्याची शक्यता पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. मात्र, अशा सर्व गुंतवणूकदारांची माहिती अद्याप उपलब्ध नसल्याने त्यांना स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांनी या फर्ममध्ये गुंतवणूक केली आहे आणि अद्याप तक्रार दाखल केलेली नाही, त्यांनी सांगवी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. गुंतवणूकदारांकडून मिळणाऱ्या माहितीमुळे संबंधित आर्थिक व्यवहारांचा तपशील आणि प्रकरणाची व्याप्ती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

पोलिसांशी संपर्क साधताना नागरिकांनी गुंतवणुकीच्या पावत्या, बँक व्यवहारांचे तपशील, करारपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे सांगण्यात आले आहे.

संपर्क : सांगवी पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड

मोबाईल क्रमांक : ८५३०३९७८३२

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित गुंतवणूकदारांनी उपलब्ध कागदपत्रांसह माहिती देऊन तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories