मालमत्ता खरेदी व्यवहारात भोसरीतील महिलेची फसवणूक
पिंपरी, ता. १७ - मालमत्ता खरेदी व्यवहारात भोसरीमधील एका महिलेची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत दोन आरोपींवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक दिनांक १५ जुलै २०२२ ते १२ जून २०२६ पर्यंत झाली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.
या फसवणुकीबाबत संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीच्या या व्यवहारात १) हरबनसिंग जब्बल (वय ७७ वर्षे, रा. निगडी प्राधिकरण) व सौ. जसविंदर कौर हरबनसिंग जब्बल (वय ७४ वर्षे) हे दोघे आरोपी आहेत.
आरोपींनी त्यांच्या मालकीची जे ब्लॉक ३२२, एमआयडीसी भोसरी येथील १४२८ चौरस मीटर जमिन व त्यावरील इमारत (बांधकाम क्षेत्र ९३४.३७ चौरस मीटर) ही मिळकत सन २०२२ मध्ये फिर्यादी महिलेला ५ कोटी रुपयांना विक्री करण्याचे ठरले होते व तशी विसार पावती करण्यात आली होती. त्यापोटी फिर्यादी महिलेने आरोपींना वेळोवेळी २ कोटी ४५ लाख रुपये दिले होते. तरीही आरोपींनी सदर मिळकत दुस-या इसमास विक्री करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती महिलेला दैनिकातील जाहीर नोटीस पाहिल्यावर लक्षात आली.
त्यानंतरही फिर्यादी महिला व आरोपी यांच्यामध्ये सदर मिळकत फिर्यादी महिलेस ६ कोटी रुपयांना विक्री करण्याचे ठरले आणि तसा खरेदी दस्त करण्यात आला होता. सदर व्यवहारापोटी फिर्यादीने आरोपीला २ कोटी ९५ लाख ५ हजार रुपये दिले असताना, आरोपीने सदरचा दस्त अस्तित्वात येऊ नये म्हणून फिर्यादी, फिर्यादीचे वकील व निबंधक कार्यालयातील लिपीकावर दस्तामध्ये फेरफार केल्याबाबत खोटी तक्रार केली होती. फिर्यादी महिलेने उर्वरीत रकमेचा डिमांड ड्राफ्ट आरोपीच्या बँक खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याचे बॅंक खाते तात्पुरते बंद केले. त्यामुळे डिमांड ड्राफ्ट स्विकारला गेला नाही व फिर्यादीची फसवणूक झाल्याचे समोर आले. फिर्यादी महिलेने आरोपींना वारंवार फोन करुन समक्ष जाऊन सदर जागेबाबत खरेदीखत करण्याबाबत विचारणा केली असता आरोपी खरेदीखत करण्यास टाळाटाळ करुन दमदाटी करुन शिवीगाळ करत आहे.
या प्रकरणी आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १६) बीएनएस कलम ३१८ (४), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.