वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने भर रस्त्यात गैरवर्तन करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १७ - शहरात अनेक ठिकाणी भर रस्त्यात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने महिला गैरवर्तन करताना आढळत आहेत. गेल्या दोन दिवसांत पिंपरी आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिला आढळल्या आहेत. एकूण चार महिलांवर पोलिसांनी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ जूनला सीआरपीएफ गेटजवळ आणि १६ जूनला पायोनियर हॉस्पीटल समोर दोन महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करताना आढळल्या. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ जूनला पिंपरी चौकापासून शगुन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिटी प्लाझा लॉजसमोर दोन महिला गैरवर्तन करत होत्या.
या महिला वेशाव्यवसाय करण्याचे उद्देशाने लैंगिक हावभाव व शब्द उच्चारत होत्या. डोळ्याने खाणाखुणा करत होत्या. त्यांच्या या वर्तणुकीमुळे सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होत होता आणि सार्वजनिक शिष्टाचारा भंग होत होता. पोलिसांनी या महिलांबद्दल तक्रार नोंदवून त्यांच्यावर तळेगाव दाभाडे व पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.