अद्ययावत तंत्रज्ञानाने शहरातील सीसीटिव्ही यंत्रणा उत्तमरित्या कार्यान्वित करावी, महापौर रवी लांडगे यांचे निर्देश
अद्ययावत तंत्रज्ञानाने शहरातील सीसीटिव्ही यंत्रणा उत्तमरित्या कार्यान्वित करावी, महापौर रवी लांडगे यांचे निर्देश
पुणे, ता. ३० - शहरात बसवण्यात आलेले अनेक सीसीटिव्ही बंद पडले आहेत. सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा सुरळीत व भक्कम करण्यासाठी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या आणि सीसीटिव्ही यंत्रणा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन गतीने उत्तमरित्या कार्यान्वित करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.
शहरवासियांच्या सुरक्षेसाठी शहरात अनेक बसवलेले सीसीटिव्ही कॅमेरे बंद पडल्याच्या तक्रारी नागरीकांकडून सातत्याने येत होत्या. प्रसारमाध्यमांनीही अनेकदा हा विषय मांडला होता. एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडल्यास तेथील सीसीटिव्ही कॅमेरे बंद असतील तर तेथे गुन्ह्याचा तपास करणेही अवघड होते. त्यामुळे शहरवासियांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महापौर व आयुक्तांनी हा महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे, त्यामुळे येत्या काळात सबंध सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेतून सुरक्षित राहील अशी आशा आहे.
या पाहणीदरम्यान फोनिक्स ग्रुपचे संस्थापक व कार्यकारी संचालक अमित महाजन तसेच ग्रिफीन रोबोटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय कर्नल दीनानाथ सिंह यांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर माहिती देत, प्रणाली अधिक प्रभावीपणे सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.