पिंपरी-चिंचवड : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात भव्य चिंतामणी दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे 5,500 पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंगलमूर्ती वाडा उजळून निघाला होता. महिला भगिनींनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांमुळे दीपोत्सवाची शोभा आणखी वाढली.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मंदिरांमध्ये दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांनी वाड्याच्या परिसरात सुबक रांगोळ्या काढून त्यावर पणत्या प्रज्वलित केल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून मंदार देव महाराज, नगरसेवक मंदार देशपांडे, ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे, सुरेश भोईर, नगरसेवक अनंता कोराळे, नगरसेविका मनीषा चिंचवडे, पतंजली योग साधनेचे डॉ. अजित जगताप, फिनोलेक्स केबल उर्सेचे एचआर प्रमुख शरद कुंभार उपस्थित होते.
यावेळी महासंघाचे शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, ब्रह्मोद्योग प्रदेश आघाडीचे ब्लू बुडूख, पवन वैद्य, राष्ट्रीय कार्यकारिणीतील सुषमा वैद्य, महिला अध्यक्ष संध्या कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, आरती कोसे, वैशाली कुलकर्णी, अस्मिता बारसावडे, सरचिटणीस राहुल कुलकर्णी, आनंद देशमुख सपत्नीक, शामकांत कुलकर्णी, प्रवीण कुरबेट, ब प्रभाग अध्यक्ष अभय कुलकर्णी, ब्रह्मोद्योग आघाडीचे उपाध्यक्ष मकरंद कुलकर्णी, ध्रुव कुलकर्णी, वैभव खरे, भूषण जोशी, सुनिधी वडगावकर, मधुवंती वखरे, अपर्णा खरे, रूपाली पाठक, धनश्री देशमुख, सौ. गुपचूप यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महासंघाच्या पुरोहित आघाडीच्या अध्यक्षपदी पुरोहित अनंत बडवे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त रमेश इनामदार यांनी आपल्या मासिक निवृत्तिवेतनातून महासंघाला भरघोस देणगी दिली. ही देणगी महासंघाचे कार्याध्यक्ष महेश बारसावडे आणि अश्विन गुडसुडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
याशिवाय गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या सारिका जपे, शिल्पा कुरले आणि प्राजक्ता धडपळे यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बारसावडे यांनी केले, तर प्रवीण कुरबेट यांनी उपस्थितांचे आभार मानले.