पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्या! 'संविधान सन्मान दौड' निमित्त 'या' मार्गांवर वाहतूक बंद

पिंपरी-चिंचवडकरांनो लक्ष द्या! 'संविधान सन्मान दौड' निमित्त 'या' मार्गांवर वाहतूक बंद

पिंपरी-चिंचवड : संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 26) शहरात प्रथमच ‘संविधान सन्मान दौड’ आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

गुरुवारी सकाळी 7 वाजता चिंचवड येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून दौड प्रारंभ होणार असून, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीमसृष्टी समाप्त होणार आहे. ‘संविधानाचा करू सन्मान, पिंपरी-चिंचवड शहर माझा अभिमान’ हा संदेश घेऊन या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.

दौड सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, तसेच सहभागी नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

  • ऑटो क्लस्टर ते हनुमान मंदिर चौक : ऑटो क्लस्टर येथून हनुमान मंदिर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. यामुळे वाहनचालकांनी मदर तेरेसा पूल, काळेवाडी, ऑटो क्लस्टर मार्गे इच्छितस्थळी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
  • सम्राट चौक ते मोरवाडी चौक : अहिल्यादेवी चौक येथून सम्राट चौक ते मोरवाडी चौक या मार्गावरही सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाहनचालकांनी सम्राट चौकातून यू-टर्न घेऊन जुने कोर्ट किंवा अजमेरा मार्गे इच्छितस्थळी जावे.
  • नेहरूनगर ते पिंपरी चौक : आंबेडकर चौक येथे नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे जाण्यासही वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाहनचालकांना महात्मा फुले स्मारकापासून डावीकडे वळून आलम गॅरेज मार्गे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • चिंचवड ते महावीर चौक : चिंचवडकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनचालकांना लोकमान्य हॉस्पिटलपासून डावीकडे वळून इच्छितस्थळी जाता येईल.
  • बसवेश्वर चौक ते महावीर चौक : तर, बसवेश्वर चौकाकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. यामुळे केएसबी चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांना बसवेश्वर चौक मार्गे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेतील या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करून संविधान सन्मान दौड यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories