क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ५ ऑगस्ट २०२६
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 स्वतःच्या खात्यावर सायबर फसवणुकीतील २२ लाख ७४ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
स्वतःचे बॅंक खाते सायबर फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्याप्रकरणी दोन युवकांवर मंगळवारी (ता. ४) दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने साथीदाराशी संगनमत करुन सायबर फसवणुकीतून मिळालेली २२ लाख ७४ हजार ६४० रुपयांची रक्कम बँक खात्यावर स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई वैभव गोरख काकडे (नेमणूक दिघी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींची नावे प्रतिक मोहन घुले (वय २२, रा. मारुती मंदिराजवळ, बोपखेल) आणि श्रीतेज नाना बुलाखे (वय २१, रा. गायकवाड नगर, दिघी) अशी आहेत. दिनांक १३ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान बोपखेल येथील लक्ष्मी निवास परिसरात आरोपी प्रतिक घुले याने त्याचा साथीदार श्रीतेज बुलाखे याच्यासोबत संगनमत करून सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बॅंक खात्यावर स्वीकारली. या खात्यावर भारतातील सात नागरिकांची फसवणूक करून मिळविलेली एकूण २२ लाख ७४ हजार ६४० रुपयांची रक्कम जमा झाल्याचे तपासात आढळून आले.
आरोपी श्रीतेज बुलाखे याने प्रतिक घुले याच्याशी संपर्क साधून त्याचे बँक खाते वापरण्यास मागितले होते. त्यासाठी २५ हजार रुपये कमिशन देण्याचे आमिष दाखविले. आरोपी व त्याचे साथीदार विविध व्यक्तींशी संपर्क साधून सायबर फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून घेत असल्याचे मोबाईल तपासणीत आढळून आले आहे.
आरोपींवर दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२ (२), ६१ (२), ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 युनिथर्म इंजिनियर्सच्या गोपनीय माहिती चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
कंपनीची गोपनीय माहिती अनधिकृतपणे कॉपी करून तिचा वापर स्पर्धक कंपनीच्या फायद्यासाठी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १८ एप्रिल २०२५ पासून ते ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत खराबवाडी (ता. खेड) येथील युनिथर्म इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीत घडली आहे.
या प्रकरणी कंपनीचे अधिकारी व्यंकटा सुदर्शन चिलकलापल्ली (वय ३९, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक सत्यनारायण शर्मा (रा. तळेगाव दाभाडे), प्रशांत नरेंद्र चव्हाण (वय ३२, रा. मोशी) आणि ध्यानेश संजय देसले (वय ३०, रा. खराबवाडी) यांनी संगनमत करून कंपनीने विश्वासाने दिलेल्या जबाबदारीचा आणि अॅक्सेसचा गैरवापर केला.
आरोपींनी कंपनीची संरक्षित व गोपनीय माहिती विनापरवानगी कॉपी केली. त्यानंतर ही माहिती स्वतःकडे तसेच इतरांकडे हस्तांतरित करून त्यात बदल करून ती डिलीट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर स्पर्धक कंपनीत काम करताना या माहितीचा वापर करून ग्राहकांना माहिती पुरवली आणि कंपनीच्या उत्पादनांच्या किमती कमी करण्यास भाग पाडले. त्यामुळे युनिथर्म इंजिनियर्स कंपनीचे ग्राहक स्पर्धक कंपनीकडे वळल्याने आर्थिक नुकसान झाले.
या प्रकरणी आरोपींवर सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(४), ३१८(३), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ४३, ६६ आणि ७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 विश्वासघात करुन हॉटेलमधील कर्मचाऱ्याकडून ९३ हजार रुपयांचा अपहार
हॉटेलमधील काउंटरवर हॉटेलचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी ठेवलेल्या मोबाईलचा तसेच दिलेल्या रोख रक्कमेचा गैरवापर करुन कामगाराने एकूण ९३ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार २४ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत मौजे हिंजवडी, माण रोड खानदेश हॉटेल येथे घडला आहे. या प्रकरणी आरोपी कामगारावर मंगळवारी (ता. ४) हिंजवडी पोलिस ठाण्यात एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, मोनिका सचिन वाडकर (वय ४३, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव महावीर भागवत पवार (रा. उपळाई, ता. माढा, जि. सोलापूर) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २६ जुलै २०२६ हिंजवडी येथील माण रोडवरील खानदेश हॉटेलमध्ये हॉटेलच्या पेमेंट व्यवहारासाठी आरोपीकडे ओप्पो कंपनीचा सुमारे ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल विश्वासाने सोपविण्यात आला होता.
या मोबाईलच्या माध्यमातून आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी ५३ हजार रुपये काढले. तसेच इतरांची देणी देण्यासाठी सोपविण्यात आलेली ३५ हजार रुपयांची रोख रक्कमही तो घेऊन गेला. विश्वासाचा गैरफायदा एकूण ९३ हजार रुपयांचा अपहार कामगाराने केला आहे. आरोपी कामगारावर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 जुन्या वादातून तरुणावर हल्ला, दुचाकीची तोडफोड
जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणावर हल्ला करून त्याच्या बुलेट दुचाकीची तोडफोड केल्याची घटना गुलीस्ताननगर, कासारवाडी येथे घडली. या प्रकरणी मंगळवारी (ता. ४) दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरबाज ताज शेख (वय २४, रा. गुलीस्ताननगर, कासारवाडी) हे ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरासमोर बुलेटवर बसून लुडो गेम खेळत होते. त्यावेळी आरोपी अरबाज कुरेशी, तरुण व त्याचे दोन अनोळखी साथीदार तेथे आले.
जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून शेख यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सिमेंट ब्लॉकने मारहाण केली तसेच दगड व अन्य हत्याराने बुलेट दुचाकीवर वार करून तिचे नुकसान केले. यावेळी फिर्यादीची आई मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपींपैकी एका अनोळखी व्यक्तीने तिलाही धक्काबुक्की केली.
घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ३१४७ पवार करीत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 देहूरोडमध्ये १८० ग्रॅम गांजासह एकास अटक
देहूरोड पोलिसांनी तळवडे गावठाण परिसरात कारवाई करून १८० ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ९ हजार रुपये आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मराठी शाळेजवळ, भैरवनाथ सोसायटीच्या मागे, चव्हाण बंधू निवास, तळवडे गावठाण येथे करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड येथील पोलिस शिपाई रणधीर रमेश माने (ब. नं. १७३९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून द्वारका विलास चव्हाण (वय ४६, रा. चव्हाण बंधू निवास, चव्हाणनगर, तळवडे, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 निगडीत भरधाव ट्रॅव्हलरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
यमुनानगर परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या फोर्स ट्रॅव्हलरने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. ४) दुपारी १२.३५ वाजण्याच्या सुमारास आशिष हौसिंग सोसायटी, सेक्टर क्रमांक २१, स्कीम क्रमांक १०, यमुनानगर, निगडी येथील रस्त्यावर झाला.
मृत तरुणीचे नाव श्रद्धा राजाराम माने (वय २५) असे आहे. याप्रकरणी तिचे काका दीपक हनमंत माने (वय ३९, रा. रावेत, पुणे) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा माने या पवळे ब्रिज, निगडी येथून यमुनानगरकडे कंपनीत कामासाठी मोपेड (एमएच ५० पी ७४२५) वरून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या फोर्स ट्रॅव्हलर (एमएच १२ डब्ल्यू जे ४९५१) चालक सुनील प्रकाश कवटेकर (वय ३२, रा. कडवाडी, ता. पाटण, जि. सातारा) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून मोपेडला जोरदार धडक दिली.
या अपघातात श्रद्धा यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला.
या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४, ११९/१७७, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भिंगारदिवे करीत आहेत
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 मोशीतील रुग्णालयाच्या पार्किंगमधून अॅक्टिव्हा चोरी
मोशी येथील अॅकॉर्ड हॉस्पिटलच्या पार्किंगमधून ३५ हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी सिद्धार्थ विठ्ठल गायकवाड (वय ३५, रा. किनईगाव, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पिवळ्या रंगाची होंडा अॅक्टिव्हा (क्र. एमएच १४ एचएन ....) अॅकॉर्ड हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या उद्देशाने दुचाकी चोरून नेली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 भोसरीत बेकायदा पिस्तूल व काडतूस बाळगणारा अटकेत
भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीत विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी पहाटे करण्यात आली.
याप्रकरणी संजय दादाभाऊ माने (वय ४४, रा. सर्व्हे नंबर बी-२०, पांडवनगर गल्ली नंबर २, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरात तपासणी केली असता त्याच्याकडे एक लाकडी मुठ असलेला बनावटी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि रेडमी कंपनीचा मोबाईल आढळून आला. ही शस्त्रे कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------