बनावट सीबीआय अधिकाऱ्यांकडून २९.१९ लाखांची फसवणूक

बनावट सीबीआय अधिकाऱ्यांकडून २९.१९ लाखांची फसवणूक

तळेगाव दाभाडे | २६ ऑक्टोबर २०२६ : केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून ५७६ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची भीती दाखवत तळेगाव दाभाडे येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीची २९ लाख १९ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. बँक खात्यांची चौकशी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३६ ते १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३७ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या प्रकरणी केदार भालचंद्र बापट (वय ५६ वर्षे, रा.  तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ते घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव एस. के. जयस्वाल असल्याचे सांगत आपण सीबीआयचा प्रधान तपास अधिकारी असल्याचा दावा केला.

त्यानंतर नरेश गोयल याने ५७६ कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले असून, या प्रकरणात सीबीआयने २४७ बँक खाती शोधली आहेत, असे संबंधित व्यक्तीने सांगितले. त्यापैकी एक बँक खाते फिर्यादीच्या नावावर असल्याचे सांगून त्यांना चौकशीची भीती दाखवण्यात आली.

या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंडांची माहिती घेतली. त्यानंतर ही रक्कम आरटीजीएसद्वारे पाठवण्यास सांगितले.

आरोपींनी आपण केलेल्या आरटीजीएस व्यवहारांचे यूटीआर क्रमांक तपासणार असल्याचे सांगितले. व्यवहार योग्य आढळल्यास रक्कम परत मिळेल आणि तसे न झाल्यास पाठवलेले पैसे ७२ तासांत परत केले जातील, असे आश्वासन देण्यात आले.

या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले. त्यामध्ये ॲक्सिस बँकेच्या खात्यात १६ लाख १४ हजार रुपये, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ११ लाख रुपये आणि इंडियन बँकेच्या खात्यात २ लाख ५ हजार रुपये पाठवण्यात आले.

अशा प्रकारे एकूण २९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. या प्रकरणात एस. के. जयस्वाल आणि समाधान पवार अशी नावे सांगणाऱ्या दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची संपूर्ण ओळख आणि पत्ते उपलब्ध नाहीत.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories