जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरपंचायतीची आढावा बैठक
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरपंचायतीची आढावा बैठक
पिंपरी, ता. ११ - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी देहू नगरपंचायतीने तयारी सुरु केलीआहे. सोहळा सुरक्षित व उत्साही वातावरणात पडण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यालगतच्या टपऱ्या, हातगाड्या आणि अन्य अतिक्रमणांवर आठवडाभरात कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत येथे पालखी सोहळा प्रमुख, नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बुधवारी (दि. १०) आढावा बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी कोंडे यांनी ही माहिती दिली. संत तुकाराम संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष प्रियंका मोरे, गटनेते योगेश परंडवाल, आदित्य टिळेकर, सुधीर काळोखे, रसिका काळोखे आदी उपस्थित होते.
सुरक्षेसाठी देहूत विविध ५० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, टेहळणी व आपत्कालीन कक्षाची उभारणी केली जाईल, सध्या मुख्य मंदिरासह वैकुंठस्थान मंदिर, घाट परिसराची साफसफाई सुरू आहे. जंतूनाशक व धूर फवारणीचे नियोजन केले आहे. पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. नगरसेवकांकडून आलेल्या मागणीनुसार त्यांच्या वॉर्डामध्ये जादा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाईल. दिंड्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे १४ ते १५ टँकर उपलब्ध केले जातील, असे चेतन कोंडे यांनी सांगितले.