मोशी–चिखलीतील पाणीटंचाई व रखडलेला रस्ते विकास....हे प्रश्न सोडवण्यासाठी उद्या स्थानिक नागरिकांचे पिंपरीत आंदोलन
मोशी–चिखलीतील पाणीटंचाई व रखडलेला रस्ते विकास....हे प्रश्न सोडवण्यासाठी उद्या स्थानिक नागरिकांचे पिंपरीत आंदोलन
पिंपरी-चिंचवड-चाकण हाउसिंग सोसायटी संघटनेकडून मोशी-चिखलीतील नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
पिंपरी, ता. ११ - चिखली परिसरातील तीव्र पाणीटंचाई, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, दूषित पाणी तसेच रखडलेल्या रस्ते विकास कामांविरोधात पिंपरी-चिंचवड-चाकण हाउसिंग सोसायटी संघटनेच्या वतीने १२ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून पिंपरीमध्ये महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे, संघटनेचे अध्यक्ष सत्यव्रत त्रिपाठी यांनी सांगितले आहे.
संघटनेने यापूर्वी बरेचदा संबंधित प्रशासकीय विभागांना निवेदने देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. पाणी समस्या तसेच ऐश्वर्यम अॅप्रोच रोड आणि होरायझन ते रामा/स्वराज कनेक्टिंग रोड या महत्त्वाच्या रस्ते विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला वेळ देण्यात आला होता. मात्र अद्याप अपेक्षित कार्यवाही न झाल्याने स्थानिक नागरीकांना आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मोशी–चिखली परिसरातील अनेक हाउसिंग सोसायट्यांना सध्या तीव्र पाणीटंचाई, अत्यल्प पाणी दाब आणि दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक सोसायट्यांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे, त्यामुळे नागरीक वैतागले आहेत.
चिखली परिसरातील नागरिक, हाउसिंग सोसायटी पदाधिकारी आणि रहिवाशांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. याबाबत बोलताना सत्यव्रत त्रिपाठी म्हणाले की, “मोशी–चिखली परिसरातील हजारो कुटुंबे पाणी व रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. नागरिकांच्या संयमाची परीक्षा आता पुरेशी झाली आहे. प्रशासनाने या प्रश्नांवर तातडीने आणि ठोस कार्यवाही करावी, यासाठीच आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करत आहोत.”