आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पेलिंग - बी स्पर्धेत पुनावळेतील लहानग्या ध्रुव मर्दीकर याचे उल्लेखनीय यश
Apr 29 2026
84
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पेलिंग - बी स्पर्धेत पुनावळेतील लहानग्या ध्रुव मर्दीकर याचे उल्लेखनीय यश
पिंपरी, ता. २९ - 'MaRRS Rediscover'संस्थेने आयोजित केलेल्या स्पेलिंग - बी स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे येथील दहा वर्षाचा विद्यार्थी ध्रुव मर्दीकर याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळवला आहे. ही स्पर्धा २६ एप्रिल रोजी मुंबईतील जीसीसी इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडली.
MaRRS (माआरआरएस) इंटरनॅशनल स्पेलिंग - बी ही आशियातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एक प्रमुख स्पर्धा आहे. ही स्पर्धा केवळ स्पेलिंग (शब्दलेखन) न शिकवता, विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेतील समज आणि शब्दसंग्रह वाढवण्यावर भर देते. देशभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ध्रुवने अगदी लहान वयात या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे.
ध्रुव पुनावळे येथील पुणेव्हिले सोसायटीत राहतो. तो विबग्योर शाळेचा विद्यार्थी आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाने ध्रुवचे अभिनंदन केले आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“ध्रुवने मिळवलेले हे यश आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्याने सातत्याने मेहनत घेतली आणि प्रत्येक टप्प्यावर लक्ष केंद्रित केले. या यशामुळे त्याला पुढे आणखी शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची प्रेरणा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्याच्या प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा देत राहू.” अशी भावना ध्रुवच्या पालकांनी व्यक्त केली.