जुन्या वादातून कुटुंबावर हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा
पिंपरी, ता. ५ - जुन्या भांडणाचा राग धरुन एका कुटुंबाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथे सोमवारी (ता. ४) घडली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दत्तात्रय भिकाजी सावंत (वय ५७, रा. बेबड ओव्हळ) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन बाबुराव जगताप, किसन बाबुराव जगताप, सुजान बापुराव जगताप, भूषण बबन जगताप तसेच दोन महिला आरोपी (सर्व रा. बेबड ओव्हळ) यांनी जुन्या भांडणाच्या वादातून सावंत यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी किसन जगताप यांनी लाकडी काठी सावंत यांच्या कपाळावर मारली. भूषण जगताप यांनी दगडाने डोळ्याजवळ मारहाण केली. सावंत यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांचा मुलगा धीरज व पत्नी माया मदतीसाठी धावून आले. त्यावेळी सुजान जगताप यांनी धीरज यांना खाली पाडून काठीने मारहाण केली. तसेच बबन जगताप यांनी सावंत यांच्या पत्नीला जोराचा धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. इतर महिला आरोपींनीही त्यांना मारहाण केली.
या प्रकरणी आरोपींविरोधात शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत. आरोपींपैकी एकाला नोटीस बजावण्यात आली आहे.