कंपनीत पोचवायचा माल टेम्पोचालकाने परस्पर विकला
पुणे, ता. ५ - गुजरातमधील जगाडिया येथून पुण्यातील भांबोली (ता. खेड) येथे माल घेऊन येणाऱ्या टेम्पोमधील सुमारे ४० हजार रुपये किंमतीच्या लाकडी फळ्या परस्पर विकल्याचा प्रकार २१ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. ४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, स्मित अमरचंद गोगरी (वय ३६, रा. कळवा, ठाणे) यांनी तक्रार दिली आहे. गोगरी यांच्या कंपनीचा टेम्पो जगाडिया गुजरात येथून माल घेऊन जयवुड पॅलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, भांबोली येथे येत होता. या दरम्यान टेम्पो चालक जितेंद्र सिंग यादव (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) याने वाहनात असलेला सुमारे ३ टन वजनाचा पाईन वूड लाकडाचा साठा, किंमत अंदाजे ४०,००० रुपये, परस्पर विकला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.