महाळुंगे | 19 सप्टेंबर 2026 : सोन्यासारखे दिसणारे दागिने दाखवून ते 10 लाख रुपयांना विकायचे असल्याचे सांगत किराणा दुकानदाराकडून 4 लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार वासुली फाटा येथे समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भाऊ सावंत (वय 39, रा. मु. करंजविहिरे, पो. शिंदे, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 19 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास वासुली फाटा येथे घडला.
फिर्यादीच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना वासुली फाटा येथे बोलावले. फिर्यादी तेथे गेल्यानंतर संबंधित व्यक्तीने विश्वास संपादन करून त्याच्याकडे असलेले सोन्यासारखे दिसणारे दागिने 10 लाख रुपयांना विकायचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था येथे गेले आणि घरातील 6 तोळे सोने तारण ठेवून 4 लाख रुपये रोख घेऊन आले.
फिर्यादीने ही 4 लाख रुपयांची रक्कम संबंधित व्यक्तींना दिली. मात्र, त्यानंतर उर्वरित 6 लाख रुपये सोमवारी देतो, असे सांगितले असता अज्ञात व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने फिर्यादीला खोटे सोन्यासारखे दिसणारे दागिने देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.