पिंपरी | 19 सप्टेंबर 2026 : शेअर मार्केटमध्ये 10 लाख रुपये गुंतवल्यास पहिले दहा महिने दरमहा एक लाख रुपये आणि त्यानंतर नफ्याच्या स्वरूपात रक्कम देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील 44 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2024 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत पवनेश्वर मंदिराजवळील फिर्यादीच्या कार्यालयात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र सुभाषराव शिलवंत (वय 44, रा. श्री साई अपार्टमेंट, मंजुळा मालुळकर पार्क, पिंपरीगाव, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. उमेश हरिराम कलानी (वय 28, रा. सी ब्लॉक, 7/1, कृष्णा सायकल्ससमोर, पिंपरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपण ‘यु.के. ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित असल्याचे सांगून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत माहिती दिली. कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये 10 लाख रुपये गुंतवल्यास पहिल्या दहा महिन्यांत दरमहा एक लाख रुपये, म्हणजे एकूण 10 लाख रुपये परत मिळतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर होणारा नफा हा नफा परतावा म्हणून दर महिन्याला देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीने संबंधित गुंतवणुकीसाठी मूळ रक्कम दिली. मात्र, ठरल्याप्रमाणे मूळ रक्कम आणि परतावा न देता आपली फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.