नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन ५ तरुणांची साडेसात लाखांची फसवणूक, हिंजवडीतील घटना, तरुणीवर गुन्हा दाखल
नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन ५ तरुणांची साडेसात लाखांची फसवणूक, हिंजवडीतील घटना, तरुणीवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ११ - नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन हिंजवडी (गेरा इम्पेरिया, फेज २) येथील सिन्क्राटेक एक्स कन्सल्टन्सीच्या संचालक तरुणीने ५ तरुणांची एकूण ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक मार्च २०२६ ते जून २०२६ या कालावधीत घडली आहे. आरोपीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, दिनेश दत्तात्रयराव भनंग (वय २८ वर्षे, रा. ता. मुळशी, मूळ गाव - जि. बीड) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. सिन्क्राटेक एक्स कन्सल्टन्सीची संचालक मुस्कान जुनेजा (वय २२ वर्षे) हिने फिर्यादी दिनेश तसेच फिर्यादीचे मित्रांना दोन महिन्यामध्ये चांगल्या आयटी कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येकाकडून ५० हजार रुपयांची मागणी केली व त्यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी दिनेशकडून २ लाख १० हजार रुपये तसेच त्याच्या इतर चार मित्रांकडून मिळुन ५,५०,०००/- रुपये असे एकूण ७ लाख ६० हजार रुपये एवढी रक्कम घेतली. दोन महिन्यानंतरदेखील या तरुणांना कोणत्याही प्रकारची नोकरी न लावता तसेच घेतलेली रककम परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. या तरुणांनी जुनेजा हीच्याकडे पाठपुरावा केला असता ती उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे तरुणांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपी संचालक तरुणीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १०) भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४),३१६ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.