निगडी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, ट्रकचालक फरार
पिंपरी, ता. ५ - निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्रिवेणीनगर चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना सोमवारी (ता. ४) पहाटे घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याबाबत, जखमी झालेले महेश बाबर (वय ३८, रा. तळवडे) यांनी तक्रार दिली आहे. महेश बाबर हे सोमवारी पहाटे गॅस भरण्यासाठी दुचाकीवरुन बाहेर गेले होते. गॅस भरून घरी परत येत असताना त्रिवेणी नगर चौकात हनुमान मंदिरासमोर मागून येणाऱ्या टाटा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात बाबर यांच्या उजव्या पायाच्या पंजा व टाचेवर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रक चालक वाहन जागीच सोडून फरार झाला.
या प्रकरणी आरोपी ट्रकचालकावर निगडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम २८१, १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.