नेहरूनगर | 16 सप्टेंबर 2026 : जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात 43 वर्षीय व्यक्तीला पत्नीने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना नेहरूनगर येथील मयूर पॅनोरमा येथे घडली. मारहाणीदरम्यान घरातील लाकडी कपाटाचा दरवाजा फिर्यादीच्या उजव्या हातावर जोरात आपटल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पत्नीसह सासऱ्याविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी स्वप्नील विजय अवघडे (वय 43, व्यवसाय नोकरी, रा. एच-301, मयूर पॅनोरमा, नेहरूनगर, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी सौ. स्नेहल स्वप्नील अवघडे (वय 38, रा. एच-301, मयूर पॅनोरमा, नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि बाजू त्रिंबक कदम (वय 65, रा. मंत्रा मोमेंट सोसायटी, मोशी, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक एक ही फिर्यादीची पत्नी आहे. जेवण बनवण्याच्या कारणावरून तिने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर हाताने मारहाण करत घरातील लाकडी कपाटाचा दरवाजा फिर्यादीच्या उजव्या हातावर जोरात आपटला. त्यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच फिर्यादीचे सासरे आरोपी क्रमांक दोन यांनीही फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 452/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.