देहूगाव | 17 सप्टेंबर 2026 : देहूगाव येथील साईनाथ इंडस्ट्रीजमध्ये काम करताना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून न दिल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कामगारांना शॉकप्रूफ सेफ्टी शूज, शॉकप्रूफ हँड ग्लोव्हज न पुरवणे तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षेसंदर्भातील सूचना व मार्गदर्शक फलक न लावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात 52 वर्षीय फॅब्रिकेशन वर्क सप्लायरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास साईनाथ इंडस्ट्रीज, विठ्ठलनगर, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे येथे घडली.
या प्रकरणी अजयकुमार माणिक राठोड (वय 31, नेमणूक देहूरोड पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी लक्ष्मण नागेश काटलाककर (वय 52, व्यवसाय फॅब्रिकेशन वर्क सप्लायर, रा. संभाजी राजे हौसिंग सोसायटी, गणेशनगर, घर नं. 136, तळवडे, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या कंपनीत काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शॉकप्रूफ सेफ्टी शूज आणि शॉकप्रूफ हँड ग्लोव्हज पुरविण्यात आले नव्हते. तसेच कामगारांच्या जनजागृतीसाठी आवश्यक सूचना फलक आणि मार्गदर्शक फलकही कामाच्या ठिकाणी लावण्यात आले नसल्याचा आरोप आहे.
कंपनीमध्ये इलेक्ट्रिक वायरिंग जागोजागी उघडी ठेवण्यात आली होती. तसेच वापरण्यास सुरक्षित नसलेली ग्राइंडिंग मशीन कामासाठी उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या मशीनमुळे इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो याची माहिती असूनही सुरक्षित नसलेली ग्राइंडिंग मशीन कामासाठी उपलब्ध करून दिल्याने शावेन रूपचंद माझी या कामगाराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 329/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 105 प्रमाणे तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.